मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे आता या दुकानांच्या विक्रीतून मंडळाच्या तिजोरीत १७१ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
२८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. तर ११२ दुकानांना बोली लावण्यात आली आहे. ११२ दुकानांसाठी मंडळाने ९७ कोटी ७४ लाखांची बोली निश्चित केली होती. पण प्रत्यक्षात मात्र १७१.३८ कोटींची बोली लागली असून ही बोली विक्रमी मानली जात आहे. मंडळाच्या निश्चित बोलीपेक्षा ७३ कोटींनी अधिक बोली लागली आहे. त्यामुळे मंडळाला १७१ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>कामाठीपुरा पुनर्विकासातील अधिमूल्याचा पर्याय, म्हाडाला १२०० कोटी?
ई लिलावानंतर आता मंडळाने दुकानांच्या वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासून ११२ यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर दुकानांच्या एकूण बोलीच्या १० टक्के रक्कम भरून घेतली जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम भरून घेत दुकानांचे वितरण यशस्वी अर्जदाराला केले जाणार आहे.
६१ दुकानांना शून्य प्रतिसाद
मुंबईतील प्रतीक्षा नगर, बिंबीसारनगर, मालाड, मालावणी आदी ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. जूनमध्ये ही प्रक्रिया संपुष्टात आली आणि २७ जून रोजी बोली लावण्यात आली. तर २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत.