खेडोपाडी पोहोचलेल्या दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले. मात्र ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमा खालोखाल लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘महाचर्चा’ या कार्यक्रमाला तमाम महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. प्रत्येक तालुक्यातून लोकांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता तब्बल पाच वर्षांच्या विरामानंतर शुक्रवारपासून पुन्हा सुरू होत आहे. ही ‘महाचर्चा’ दर शुक्रवारी संध्याकाळी ५.०५ ते ६.०० या कालावधीत दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
मुंबई दूरदर्शनचे तत्कालीन संचालक मुकेश शर्मा यांच्या संकल्पनेतून २००२ मध्ये सुरू झालेल्या ‘महाचर्चा’ या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. महाराष्ट्रातील एकही तालुका असा नाही, ज्या तालुक्यातील व्यक्ती ‘महाचर्चा’ या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून तरी सहभागी झालेली नाही, असे या कार्यक्रमाचे निर्माते जयू भाटकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. २००२ ते २००७ या पाच वर्षांत या कार्यक्रमाने केवळ लोकप्रियताच मिळवली नाही, तर विविध पारितोषिकेही पटकावली. विविध वृत्तवाहिन्यांवर सध्या सुरू असलेल्या ‘लाइव्ह टॉक शो’ची जननी म्हणून दूरदर्शनच्या या कार्यक्रमाकडे बोट दाखवता येईल, असेही भाटकर यांनी सांगितले.
लोकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू असलेली ही ‘महाचर्चा’ मुकेश शर्मा यांच्या बदलीनंतर २००७ मध्ये बंद पडली. मात्र आता १ नोव्हेंबर रोजी मुकेश शर्मा यांनी पुन्हा एकदा मुंबई दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकपदाची जबाबदारी हाती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शुक्रवार ‘महाचर्चा’चा पहिला भाग थेट प्रक्षेपित होणार आहे. या भागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्र उभारणी’ या विषयावर चर्चा होणार असून या चर्चेत हरी नरके, विजय कांबळे आणि महेंद्र साळवे हे सहभागी होणार आहेत. त्याशिवाय गोवा दूरदर्शनच्या स्टुडियोतून ज्येष्ठ साहित्यिक, कवी, आमदार विष्णू सुर्या वाघ हेदेखील सहभागी
होणार आहेत. तसेच या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र जाधव यांची छोटेखानी मुलाखतही प्रसृत होणार असल्याची माहिती भाटकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्ज्वला बर्वे करणार आहेत.
दूरदर्शनवरील एखादा कार्यक्रम बंद करण्यात आला की, तो पुन्हा सुरू होत नाही. मात्र ‘महाचर्चा’ने हा इतिहास घडवला आहे. सरकारी चौकट असताना त्याही वेळी ‘महाचर्चा’ने वेगवेगळ्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा घडवून आणली होती. या कार्यक्रमाने आपल्याला बरेच काही शिकवले. या कार्यक्रम निर्मितीची जबाबदारी आपल्यावरच आल्याने आपण आनंदात आहोत, असे भाटकर यांनी सांगितले.    

Story img Loader