मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन शौचालये, पाण्याची व्यवस्था
भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. त्याचप्रमाणे मोर्चाच्या मार्गावर तात्पुरती शौचालये व पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे.
आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराचा उपयोग केला जातो. मात्र मोर्चातील सहभागींची संख्या लक्षात घेता हे प्रवेशद्वार अपुरे पडणार असल्याने हजारीमल सोमानी मार्गावरील रेलिंग काढून मैदानात जाण्याचा मार्ग मोठा करण्यात आला आहे. सीएसटी ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणारे हजारो पादचारी या मार्गाचा रोज उपयोग करतात. आझाद मैदानात सध्या मेट्रो तीनच्या कामासाठी मोठा भाग मेट्रो रेल महामंडळाच्या ताब्यात आहे. मोर्चातील लाखो सहभागकर्त्यांसाठी मैदानाची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. बॉम्बे जिमखान्यासमोरच्या जागेचाही वापर करता येईल. ही जागा यापूर्वीच सर्वासाठी खुली असल्याचे फलक लावले गेले आहेत.
मोर्चासाठी सुरक्षाव्यवस्था व व्यवस्थापन पाहण्यासाठी गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची बैठक झाली. त्यात मैदानाचे प्रवेशद्वार मोठे करण्याची तसेच जिमखान्यासमोरील जागेचा वापर करण्याबाबत चर्चा झाली. मोर्चामधील सहभागकर्त्यांसाठी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. २० शौचकूपांची सोय असलेली १४ तात्पुरती शौचालये ठेवण्यात आली आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, जेजे रुग्णालय, सीएसटी स्टेशन, आझाद मैदान येथे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहेत.