मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहेत. चिंता करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग आणून महाराष्ट्राला विकासात सर्वोच्चस्थानी नेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल आणि विदेशी गुंतवणूकही वाढेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल, असे शिंदे यांनी सांगितले. हे सरकार लोकाभिमुख, विकासाभिमुख असेल. गेल्या तीन महिन्यांत जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. सरकार विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. करोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले.
राज्यातून काही प्रकल्प गुजरातला जात असल्याबद्दल सरकारवर होत असलेल्या आरोपांचा इन्कार करताना, राज्यात नव्या प्रकल्पांविषयी मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. येत्या काळात राज्यात होणाऱ्या सर्व औद्योगिक सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. महामार्गालगत नवनगर, नोडस, ‘नॉलेज सिटी’ उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. प्रक्रिया उद्योगही सुरू होईल. शिर्डीपर्यंतचा मार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षांत समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड, संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गाजवळसुद्धा उद्योग वाढत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि सर्वच क्षेत्रांत समृद्धी येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त..
मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचे काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरुवात झाली आहे. सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षांत पूर्ण होतील. येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.