जीवरक्षकांनी १३ जणांना वाचवले
गेल्या काही वर्षांत अनेक जणांचे बळी घेणाऱ्या अक्सा समुद्रावर मंगळवारी एक मोठी दुर्घटना जीवरक्षक रजनीकांत माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळली.
आक्सा समुद्रात उतरलेल्या १३ जणांचे प्राण माशेलकर यांच्या पथकाने वाचवले. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोहम्मद सय्यद (२१), समीर खान (१७), राहुल शिंदे (१८), मोहसीन शेख नझीम (१९) आणि सना सय्यद (१३) हे पोहोण्यास उतरले. हे पाच जण जेथे पोहोत होते तेथे खड्डे असल्याने माशेलकर आणि नथुराम सूर्यवंशी, मोहन येरंडे, प्रीतम कोळी, समीर कोळी या त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्वाना बाहेर येण्याची सूचना केली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडू लागले. जीवरक्षकांचे पथक सुदैवाने तेथेच असल्याने त्यांनी सर्वाना सुखरूप बाहेर काढले. याचवेळी मालवणीत राहणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांतील नर्गीस रहमान (३५), आयेशा अन्सारी (४०), झेबा (२६), अल्तमश (१३), तबस्सुम (१६), सालिक (१३), गजाला (१३), फरीन (१८) आदी पाण्यात उतरले. हे सर्वही बुडू लागले, माशेलकर यांनी तातडीने प्रथम अन्सारी कुटुंबीयांना वाचविण्यासाठी धाव घेतली. या सर्वाना वाचविण्यात त्यांना यश आले.