राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं आहे. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली. ते सोमवारी (३ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मी माध्यमांमध्ये पाहिलं की, नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. मी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेला विधीमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे.”

व्हिडीओ पाहा :

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही आमच्याकडेच”

“बहुसंख्य आमदार हे आमच्याबरोबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. सुनील तटकरेंची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “अजित पवार शिंदे-फडणवीसांबरोबर जातील याचा अंदाज…”, राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवारांचं मोठं विधान

“आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही”

अजित पवार पुढे म्हणाले, “काहींनी आमच्या विरोधात नोटीस वगैरे काढली आहे. मात्र, तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही.”

“केंद्र सरकार बरोबर असेल तर फायदा होतो”

“केंद्र सरकार बरोबर असेल तर फायदा होतो. राज्यातील कामांसाठी केंद्र सरकारचा निधी, परवानग्या लागतात. केंद्र सरकार वेगळ्या विचारांचं आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असलं तर निधीच्या बाबतीत कमतरता राहते,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष”

पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुनील तटकरेंची नियुक्ती प्रफुल पटेल यांनी केली आहे. मी पण पक्ष स्थापन झाल्यापासून भुजबळांच्या नेतृत्वात काम केलं. काल मला जी माहिती मिळाली त्यात सुनील तटकरेंची नियुक्ती पटेल यांनी केली.”

हेही वाचा : जयंत पाटलांच्या मागणीनुसार अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करणार का? राहुल नार्वेकर म्हणाले, “मला…”

“काही मान्यवरांनी रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेतली”

“काही मान्यवरांची अशी वक्तव्यं आली की, आम्ही कायदेशीर मार्गाने न जाता जनतेत जाऊ. पण रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगण्यात येत आहेत. त्याला काही अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती योग्य, चांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big political move by ajit pawar faction about sharad pawar faction jayant patil jitendra awhad pbs