मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून अर्थात तात्पुरते देकार पत्र वितरीत झाल्यापासून सेवाशुल्क आकारले जाते. मात्र काही विजेत्यांकडून घराचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास विलंब होतो आणि त्यांच्यावर सेवाशुल्कापोटी थकबाकीचा भार पडतो. पण आता मात्र विजेत्यांचा सेवाशुल्कापोटीचा थकबाकीचा भार कमी होणार आहे. आता विजेत्याला ताबा पत्र मिळाल्याच्या दिवसापासून सेवाशुल्क आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला आहे. हा निर्णय म्हाडा विजेत्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मुंबईसारख्या शहरात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होते. त्यामुळे मुंबई मंडळाच्या घरांना मोठी मागणी आहे. मात्र अनेकदा म्हाडाच्या घरांचा किंमती आणि काही विजेत्यांचे उत्पन्न यात तफावत असल्याने त्यांना गृहकर्ज मिळविण्यासाठी वेळ लागतो. घराची रक्कम जमविण्यासाठी वेळ लागतो. परिणामी घराचा ताबा प्रक्रिया सुरू झाल्यापासून अर्थात तात्पुरते देकार पत्र मिळाल्यानंतर निश्चित कालावधीत अनेक विजेते घराची रक्कम अदा करून ताबा घेण्यास असमर्थ ठरतात. यासह अन्य कारणांमुळे काही विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ घ्यावी लागते. ताबा घेण्यास विलंब झालेल्या विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून प्रत्यक्ष ताबा मिळाल्याच्या दिवसापर्यंतचे सेवाशुल्क अदा करावे लागते. सेवाशुल्कापोटीची थकबाकी भरावी लागते. त्याचा विजेत्यांवर आर्थिक भार पडतो.
हेही वाचा – मुंबई : कुर्ल्यात मुलीने केली वृद्ध महिलेची हत्या
हेही वाचा – प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला
u
विजेत्यांवरील थकबाकीचा हा भार कमी करण्यासाठी मुंबई मंडळाने म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार विजेत्यांना ताबा पत्र मिळाल्यापासूनच्या तारखेपासून सेवाशुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव जयस्वाल यांनी मान्य केल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जयस्वाल यांच्या निर्णयानुसार आता विजेत्यांना थकीत सेवाशुल्क अदा करावे लागणार नाही. ताबा मिळाल्याच्या तारखेपासूनचेच सेवाशुल्क विजेत्यांना आता भरावे लागेल. त्यामुळे हा निर्णय म्हाडाच्या विजेत्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.