मुंबईतील गोराई येथे एका तरुणाचा मृतदेह मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. मृतदेहाचे सात तुकडे करून एका गोणीत भरले होते, ही गोणी रविवारी आढळून आली. आंतरधर्मीय संबंधांतून ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव रघुनंदन पासवान (२१) असून तो बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कन्होली गावातला होता. या गुन्ह्याशी संबंधात एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत तरुणाचा एक मित्र या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, रघुनंदन याच्या हत्येमागे आंतरधर्मीय संबंध हे कारण असू शकते. १७ वर्षीय मुलीने पासवानशी ब्रेकअप केले होते. त्यानंतर मुलीच्या भावाने तिला मुंबईत आणले. मात्र पासवानला तिच्याशी संबंध ठेवायचे होते. याचा राग मुलीच्या कुटुंबियांना होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या भावांनी भाईंदर येथे पासवानचा खून केला आणि त्याचा मृतदेह रिक्षातून आणून गोराई येथे टाकला. रिक्षा ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
आंतरधर्मीय संबंधातून खूनाच्या धमक्या
रघुनंदन पासवानचे वडील जितेंद्र पासवान यांनी मृतदेहाच्या उजव्या हातावरील ‘आरए’ नावाचा टॅटू पाहून हा मृतदेह त्याचाच असल्याचे ओळखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनंदनचे ज्या मुलीशी संबंध होते, त्याचे नाव ‘ए’ या इंग्रजी आद्यक्षरापासून सुरू होत होते.
जितेंद्र पासवान यांनीच या हत्येला मुलीचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांचा मुलगा हा सदर मुलगी आणि तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात होता. मंगळवारी मला पोलिसांनी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. मी मृतदेहाची ओळख पटवली असून त्यांना तपासात सहकार्य करत आहे, अशी माहिती जितेंद्र यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
जितेंद्र हा पुण्यात खासगी कंपनीत काम करत होता. तसेच दिवाळीसाठी तो घरी आला होता. रघुनंदन शाळातून बाहेर पडला होता. सध्या तो पुण्यातील सारसवाडी येथे राहत होता. जितेंद्र म्हणाले की, रघुनंदन बिहारमध्ये एका रुग्णालयात काम करत असताना त्याने सदर मुलीला मदत केली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि संपर्कात होते. यानंतर मुलीच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी रघुनंदनला धमकी दिली होती.