मुंबई : पवई येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या खोल खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी झाल्याची आणि या खड्ड्याभोवती रस्ता रोधक लावलेले नसल्याची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच, महापालिका आयुक्तांनी या घटनेप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी पवई येथील महात्मा फुले नगरमध्ये घडली होती.
मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी दाखल अवमान याचिकेवरील सुनावणीच्या वेळी वकील रूजू ठक्कर यांनी ही घटना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निदर्शास आणून दिली. या घटनेबाबत वृत्तपंत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पवई येथील महात्मा फुले नगरमधील रस्त्याच्या मधोमध १५ फूट खड्ड्यात पडण्यापासून एका लहान मुलाचा बचाव करताना दुचाकीस्वार हिरेन कनोजिया हा त्यात पडला व गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेमुळे त्याला तीन चार शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा – मुंबई : सांताक्रुझमध्ये हॉटेलला आग
हेही वाचा – मुंबई : नायर रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता या खड्ड्याभोवती महापालिकेने रस्ते रोधक उभारणे आवश्यक होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव खड्ड्याभोवती रस्ते रोधक उभारण्यात आले नव्हते. परिणामी, हा दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाल्याचे ठक्कर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणी महापालिका आयुक्तांनीच प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. खड्डे किंवा खुल्या भुयारी गटारांत पडून कोणी जखमी झाले किंवा कोणाला जीव गमवाला लागल्यास त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर, मुंबईतील खड्डे बुजवले जातील, सगळी भुयारी गटारे सुरक्षित केली जातील, अशी हमी महापालिकेने न्यायालयाला दिली होती. त्या पार्श्वभूमीवर, ठक्कर यांनी पवई येथील घटनेबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.