मुंबई : एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने समाजमाध्यमांवर दुचाकी चोरीचे धडे घेऊन दोन दुचाकी चोरल्याचा प्रकार भांडुप येथे उघडकीस आला. या आरोपीला भांडुप पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली असून त्याने चोरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
आकाश मकवाना (वय २७) असे या आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. आकाश उच्चशिक्षित असून अनेक वर्षे तो बेरोजगार होता. दिवसभर तो मोबाइलवर निरनिराळ्या गोष्टी पाहात वेळ घालवत होता. यादरम्यान चावी नसताना दुचाकी कशा प्रकारे सुरू करायची याची माहिती त्याने समाजमाध्यमांवरून मिळविली. त्यानंतर त्याने समाजमाध्यमांवर विक्रीसाठी असलेल्या दुचाकींच्या मालकांची भेट घेतली. दुचाकी उभ्या करण्यात येत असलेल्या परिसराची रेकी करून त्याने रात्री भांडुप परिसरातून दोन दुचाकी चोरल्या. भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सानप आणि त्यांच्या पथकाने सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली. आरोपीला नालासोपारा येथून अटक केली.