लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : पवई येथे टेम्पोने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे धडक दिल्यानंतर आरोपी टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला कोणतीही मदत न करता तेथून पलायन केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी स्वतः या प्रकरणी तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार चिंतामणी सखाराम बेलकर (५३) हे पवई मोबाईल व्हॅनवर कार्यरत असताना त्यांना दूरध्वनी आला. पवई प्लाझा येथे अपघात झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलीस पथक पवई प्लाझा येथे रवाना झाले. त्यावेळी तेथे नागरिकांची गर्दी झाली होती. काही नागरिक जखमी व्यक्तीला रिक्षातून रुग्णालयात घेऊन जात होते. घटनास्थळावर दुचाकी खाली पडली होती. शेजारी टेम्पो बंद अवस्थेत उभा होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

अपघात कसा घडला

तक्रारदार बेलकर यांनी माहिती घेतली असता अपघात पवईतील जेव्हीएलआर रोड, पवई प्लाझा सिग्नल येथून कांजूरमार्गकडे जाणार्या वाहिनीवर झाला. दुचाकीस्वार वीरेंद्र देवनाथ मिश्रा (४०) पवईतील अय्यप्पा मंदिराजवळील हरिओम नगरमधील रहिवाशी होते. ते त्याच्या दुचाकीवरून कांजूरमार्गच्या दिशेने जात होते.

पवई प्लाझा सिग्नलजवळ दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मिश्रा यांना तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर टेम्पोचालक झाहीद अलूमछाह अन्सारी घटनास्थळाहून पळून गेला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भरधाव वेगाने व निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टेम्पोच्या क्रमांकावरून चालक सापडला

प्राथमिक तपासणीत कांजूरमार्गकडे जाणारा सिग्नल सुरू झाल्यामुळे मिश्रा तेथून दुचाकी घेऊन जात होते. त्याच वेळी जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने मिश्रा यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मिश्रा यांच्या डोक्यावर, कपाळावर व हनुवटीवर गंभीर दुखापत झाली. त्यांना सुरूवातीला पवई रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना राजावाडी रुगणालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनास्थळावर उभ्या टेम्पोच्या क्रमांकावरून पोलिसांनी तो गोरेगाव येथील रहिवासी परवेज आलम याचा असल्याचे समजले. त्या माहितीवरून आलमला पोलिसांनी बोलावून घेतले. संबंधित टेम्पो चालक झाहिद अन्सारी चालवत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार करून झाहिदविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच अपघात केल्यानंतर आरोपीने पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader