१५ दिवसांत ३० जणांवर कारवाई; तरीही वेगाशी स्पर्धा कायम
भरधाव वेगात मोटारसायकल हाकून स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्याही जिवावर उठलेल्या मोटारसायकलस्वारांच्या उच्छादाने दक्षिण मुंबईतील पोलीस हैराण झाले आहेत. नरिमन पॉइंटपासून मरिन ड्राइव्ह ते थेट गिरगाव चौपाटीपर्यंत शुक्रवार ते रविवारी रात्री मोटारसायकल दामटविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यांचा बंदोबस्त करायला अतिरिक्त पोलिसांची कुमक तनात करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांनी गेल्या १५ दिवसांत ३० हून अधिक मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली असली तरी मोटारसायकलस्वारांची वेगाशी स्पर्धा सुरूच आहे.
नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंतचा परिसर म्हणजे मुंबईकरांची तसेच मुंबईला पर्यटनासाठी येणाऱ्यांची हक्काची जागा. त्यातच, शुक्रवार रात्रीपासून हा परिसर पर्यटकांनी फुलून जातो. पण, रोंरावत येणाऱ्या मोटारसायकलींच्या आवाजामुळे इथली रात्रीची शांतता भंग होऊ लागली आहे. दिवसाउजेडीही येथून मोटारसायकल स्वार सैराटपणे गाडी हाकत असतात. या ठिकाणी महागडय़ा तसेच २०० सीसींपेक्षा अधिकच्या मोटारसायकल वेगाने दामटविण्याच्या प्रकारात कमालीची वाढ झाली असून यामुळे रस्ता ओलांडणाऱ्यांबरोबरच नियमाने गाडी चालविणाऱ्या चालकांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यांना आवरण्यासाठी मुंबई पोलिसांनी अतिरिक्त बल लावण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवार रात्रीपासून शनिवार आणि रविवारी अनेक तरुण जोरात मोटारसायकल चालवीत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. त्यामुळेच आम्ही संपूर्ण पट्टय़ात बंदोबस्तात वाढ करण्यास सुरुवात केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी तीन दिवस अनेक ठिकाणी नाकाबंदी करून मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात येत असून गेल्या १५ दिवसांत विविध कलमाअंतर्गत ३० हून अधिक तरुणांवर कारवाई केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांचेही जीवित धोक्यात
भरधाव वेगात मोटारसायकल चालविणाऱ्यांना रोखणे पोलिसांपुढचे एक आव्हानच ठरत आहे. लोखंडी अडथळे (बॅरिकेड्स) उभारून नाकाबंदी करीत असताना सुसाट वेगात येणारे मोटारसायकलस्वार पोलिसांना जुमानत नाहीत. तसेच, पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न करतात. तर काही जण नाकाबंदीजवळ धिम्या गतीने मोटारसायकल आणून पोलीस जवळ येताच धूम ठोकत असल्याने अशा नाकाबंदी करताना पोलिसांनाही आपले जीवित सांभाळावे लागत आहे.

Story img Loader