शाळेच्या विरोधात पत्रकबाजी आणि प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देऊन शाळेची बदनामी केल्याचा ठपका वागळे इस्टेट येथील बिलाबाँग शाळा व्यवस्थापनाने दोन पालकांवर ठेवला असून या संदर्भात त्यांना पाच कोटी रुपयांची अब्रुनूकसानीची नोटीसही पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वागळे इस्टेट येथील बिलाबाँग शाळा व्यवस्थापनाने ऑक्टोंबर २०१२ मध्ये फि वाढीचे संकेत दिले होते. मात्र, त्यास पालकांनी कडाडून विरोध केला. तसेच त्याविरोधात आंदोलनेही केली होती. या शाळेच्या फि वाढीचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. तसेच या प्रकरणी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. दरम्यान, भरघोस फि वाढीमुळे या शाळेची मान्यता रद्द करावी आणि शाळेने आतापर्यंत वसूल केलेल्या पैशांचे धर्मदाय आयुक्तांकडून लेखापरिक्षण करावे, असा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना दिला होता. असे असतानाच शाळेच्या व्यवस्थापनाने फि वाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दोन पालकांना पाच कोटी रूपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.