Billionaire businessman Niranjan Hiranandani Travel By mumbai Local : कर्जत-कसारा, वसई-विरार आणि पनवेलपर्यंत पोहोचलेल्या मुंबई लोकलची भुरळ प्रत्येकाला पडते. मुंबईतील रस्ते वाहतूक वेळखाऊ असते. त्यामुळे मुंबई लोकल सर्वांसाठी फायदेशीर ठरते. कमी वेळेत मुंबईत पोहोचायचं असेल किंवा मुंबईतून कर्जत-कसारा, वसई-विरार किंवा पनवेलला जायचं असेल तर अनेकजण मुंबई लोकलचा वापर करतात. आता चक्क एका अब्जाधिश उद्योगपतीने कमी वेळात उल्हासनगरला पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबई लोकलचा वापर केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी मुंबई ते उल्हासनगर असा मुंबई लोकलने प्रवास केला. मुंबईच्या एसी लोकलने त्यांनी उल्हासनगर गाठलं. वेळ वाचवाणारं आणि मुंबईतील वाहतूक कोंडीविरोधात सामना करणाऱ्या मुंबईच्या एसी लोकलने मुंबई ते उल्हासनगर असा प्रवास केला. हा प्रवास अभ्यासपूर्ण होता, अशी पोस्ट व्हीडिओसहित निरंजन हिरानंदानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत.

हा व्हीडिओ २४ तासांआधीच हिरानंदानी यांनी शेअर केला आहे. २४ तासांत या व्हिडीओला २१ मिलिअन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. दरम्यान, हिरानंदानी चुकून अपंग कोचमध्ये चढले असल्याची प्रतिक्रिया काही नेटिझन्सने दिली आहे. तर, अनेकांनी हिरानंदानी यांचं कौतुक केलं आहे. तसंच, अनेक उद्योगपतींनी सार्वजनिक वाहतूक वापरली तर सरकार लोकांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहित होईल, असंही एकाने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या अनेक प्रतिष्ठित लोकांकडूनही मुंबई लोकलचा वापर केला जातो. मुंबईच्या रस्ते वाहतूक कोंडीत अडकून पडण्यापेक्षा त्यांना मुंबईची लोकल आपलीशी वाटते. त्यातच, रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य आणि पश्चिम मार्गावर एसी लोकल सुरू केल्याने अनेक प्रतिष्ठित लोक या एसी लोकलमधून प्रवास करतात. परिणामी रस्ते वाहतूक कमी होते. निरंजन हिरानंदानी यांच्यासारख्या अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास आगामी काळात वाहतूक कोंडी कमी होऊन सार्वजिक वाहतूक व्यवस्था सुधारली जाऊ शकेल.

हेही वाचा >> सात तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर आमदाराने केला लोकल प्रवास, मुंबईकरांच्या स्पिरीटचं कौतुक करत म्हणाले…

मुंबईबाहेरून येणारे अनेक लोकप्रतिनिधीही अनेकदा मुंबई लोकलचा वापर करतात. काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनीही खड्डे आणि वाहतूक कोंडीला वैतागून मुंबई लोकलची वाट धरली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billionaire industrialists journey through mumbai local posting a video he said journey to ulhasnagar sgk