मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय दुरुस्ती मंडळाने घेतला आहे. आठवड्याभरात या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. हे सर्वेक्षण, शिबिरार्थींची वर्गवारी पूर्ण करून यासंबंधीची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे संक्रमण शिबिरात पुनर्वसन करण्यात येते. मुंबईत विविध ठिकाणी दुरुस्ती मंडळाची संक्रमण शिबिरे असून यात अंदाजे २० हजार संक्रमण शिबिरार्थी असल्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी या २० हजार संक्रमण शिबिरार्थींमध्ये अंदाजे आठ हजार घुसखोर असण्याची शक्यता आहे. घुसखोरांना बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न मंडळाकडून मागील काही वर्षात झाले. पण त्यात त्यांना यश आलेले नाही. घुसखोरांकडून बृहतसूची यादीतील घरे लाटली जात असल्याचाही आरोप होत आहे. या घुसखोरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडून बांधकाम शुल्क आणि इतर शुल्क वसूल करून त्यांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या अनुषंगाने अधिकृत मूळ भाडेकरू आणि घुसखोर यांची वर्गवारी निश्चित करण्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय २०२१ मध्ये मंडळाने घेतला होता. यासाठी एका कंपनीची नियुक्तीही केली. मात्र हे सर्वेक्षण अद्याप मार्गी लागलेले नाही. आता मात्र संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण मार्गी लावण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – सिद्धार्थ रुग्णालयातील आरोग्य सुविधा जानेवारी २०२६ पर्यंत सुरू करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

हेही वाचा – अन्न सुरक्षेचा १०० दिवसांचा कृती आराखडा, अन्न व औषध प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती

राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’मध्ये अधिकृत मूळ भाडेकरू, ‘ब’मध्ये खरेदी – विक्री व्यवहार केलेले रहिवासी आणि ‘क’मध्ये घुसखोरांचा समावेश असणार आहे. या वर्गवारीनुसार बायोमेट्रीक सर्वेक्षणास आठवड्याभरात क्षितिज क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० हजारांपैकी २००० संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक पूर्ण करून त्यांची वर्गवारी पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजने आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मंडळाने हे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून रखडलेले हे सर्वेक्षण आता पूर्ण करून वर्गवारीनुसार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार घुसखोरांविरोधातील आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biometric survey campers begin within a week mumbai print news ssb