मुंबईमध्ये कबुतरांची संख्या बेसुमार वाढल्याने आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कबुतरांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी वैद्यकीय जगतातून आवाज उठवला जात आहे. कबुतरांच्या या अनैसर्गिक वाढीला आळा घालावा यासाठी आता पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमीही आवाज उठवू लागले असून महापालिका व संबंधितांनी यावर ठोस उपाय योजण्याची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये कबुतरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कबुतरांची ही बेसुमार संख्या व मुक्त संचारामुळे मात्र सार्वजनिक आरोग्याचे तसेच इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येला आवर घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने कबुतरांना दाण्यांमधून निर्बीजीकरणाचे औषध देण्याविषयीचा निर्णय तत्त्वत: घेतला आहे. महानगरपालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून त्यासंबंधी परवानगीही मागितली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाला सामान्य नागरिकांबरोबरच अनेक पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमींचाही पाठिंबा मिळत आहे. टोलेजंग इमारतींच्या बांधकाम रचनेमुळे कबुतरांना घरटी बांधण्यासाठी चांगलाच वाव मिळत असल्याने येथे कबुतरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या रहिवासी सोसायटय़ांबरोबरच गेटवे ऑफ इंडिया, फोर्ट येथील जीपीओ, दादर येथील भवानीशंकर मार्ग, मुंबई सेंट्रल, घाटकोपर आदी भागांतील कबुतरखान्यांमध्ये धार्मिक श्रद्धेमुळे तसेच पक्षिप्रेमामुळे अनेक जण त्यांना धान्य खायला घालत असतात. कबुतरांना या ठिकाणी मुबलक अन्न मिळत असल्याने या कबुतरखान्यांच्या परिसरात तर त्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यामुळे या परिसरात कबुतरांच्या विष्ठेतून येणाऱ्या ‘हिस्टोप्लाझ्मा’ या बुरशीचे प्रमाण वाढत असून यामुळे सर्दी, ताप तसेच श्वसनाशी निगडित विकारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यासाठी कबुतरांची वाढती संख्या मुख्यत: कारणीभूत असल्याचे अलीकडेच एका वैद्यकीय सर्वेक्षणात समोर आले आहे. हे सर्व पाहता महानगरपालिकेने घेतलेल्या कबुतरांच्या निर्बीजीकरणाच्या निर्णयाचे अनेक पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमींनीही स्वागत केले असून निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणीही त्यांच्याकडून केली जाऊ लागली आहे. तसेच कबुतरांच्या बेसुमार वाढीला कारणीभूत असलेले शहरातील कबुतरखानेही बंद केले जावेत, अशी मागणीही काही पक्षिमित्रांकडून केली जात आहे.
शहरात वाढलेली कबुतरांची संख्या ही अनैसर्गिक वाढ आहे. ही बेसुमार वाढ होण्यासाठी कबुतरखानेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. शहरातील केवळ १० टक्केच लोक त्यांना विविध कारणांनी धान्य खायला घालत असतात. लोकांच्या श्रद्धेचा व पक्षिप्रेमाचा फायदा घेत या कबुतरखान्यांची निर्मिती केली गेली आहे. यातून करोडो रुपयांचे धान्य दररोज विकले जात असून त्यामुळे व्यापाऱ्यांचेही यात हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे कबुतरांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाबरोबरच कबुतरखानेही बंद करणे गरजेचे आहे.
– मोहम्मद दिलावर, अध्यक्ष, नेचर फॉरेव्हर सोसायटी