वातावरणातील धोके टाळण्यासाठी झाडांच्या शेंडय़ांवर घरटी
बदलत्या वातावरणाशी अनुकूलन साधत परिस्थितीला तोंड देणे, हा सजीवांचा गुणधर्म. जमिनीवरची जागा अपुरी पडू लागल्याने मानवाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारतींमध्ये घरोबा करण्यास सुरुवात केली. हाच प्रकार आता मुंबई आणि आसपासच्या शहरांतील पक्ष्यांच्या बाबतीत दिसू लागला असून बहुतांश पक्षी प्रजातींनी झाडाच्या मध्यभागाऐवजी शेंडय़ाजवळच्या भागांत उंचावर घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मानवी अतिक्रमणांचा धोका, मांजरीसारख्या प्राण्यांची वाढती संख्या आणि सुरक्षितता या दृष्टीने पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या जागेत बदल होऊ लागल्याचे निरीक्षण पक्षितज्ज्ञांनी नोंदवले आहे.
मुंबईच्या वाढत्या नागरीकरणामुळे निसर्गाला प्रथम तिलांजली मिळत असून त्याचा परिणाम येथील जैवविविधतेवर जलद गतीने होत आहे. यामुळे मुंबई व नजीकच्या उपनगरातील बाधित झालेले प्राणी जगत आपल्या राहणीमानात बदल घडवत असल्याचे दिसते. मुंबईच्या आसपास आढळणारे सूर्यपक्षी, शिंपी, लाल बुडाचे बुलबुल, पांढऱ्या गळ्याचा नाचरा पक्षी हे आकाराने अत्यंत लहान असून अधिवासात त्यांच्यासाठी उत्पन्न झालेल्या नव्या धोक्यांना टाळण्यासाठी त्यांनी आपली घरटी जवळपास ४० फूट उंचीच्या झाडांच्या टोकावर बांधल्याचे निरीक्षणादरम्यान आढळले, असे पर्यावरणतज्ज्ञ व छायाचित्रकार संजोय मोंगा यांनी सांगितले. मोंगा यांनी कांदिवली, दादर, ठाणे या पट्टय़ात केलेल्या पाहणीत त्यांना ही बाब आढळली. ‘‘या पक्ष्यांची घरटी अन्य पक्ष्यांच्या तुलनेत छोटी असून त्यांच्या मागावर असलेल्या शिकाऱ्यांना चटकन आढळूनही येत नाहीत. मात्र, त्यांची घरटी ही कमी उंचीवरच तयार करण्यात येतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून ती झाडाच्या उंचावर बांधल्याचे निरीक्षणादरम्यान दिसले,’’ असे ते म्हणाले. यावरून पक्ष्यांनी आपल्या राहणीमानात बदल केल्याचे दिसते, असे मत त्यांनी मांडले. अर्थात या निरीक्षणाला ठोस संशोधनाची जोड मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा