मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत असून मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून सुमारे १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला असून, दररोज साधारण १० पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत. तसेच प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल महिना सुरू झाल्यापासून मुंबईसह राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारी अंगाची लाही लाही होत आहे. आतापर्यंत उष्माघाताचा ७७ जणांना त्रास झाला आहे. माणसांप्रमाणे पक्षी व प्राण्यांनाही उन्हाचा त्रास होत आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून जवळपास १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास झाला आहे. यामध्ये ४० गाईंचा समावेश असून, काही श्वानांना निर्जलीकरणाचा त्रास झाला आहे. तर सुमारे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये २२ कबूतर, १६ कावळे, एक पोपट, दोन मैना, १७ घारींचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे या पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते निपचित पडलेले पक्षीप्रेमी व स्वयंसेवकांना आढळले. यापैकी काही पक्षी शरीरातील पाणी कमी झाल्याने झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत. या पक्षी व प्राण्यांवर परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा हॉस्पिटल) या रुग्णालयात उपचार करण्यात आले. वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दररोज साधारणपणे १० ते १२ पक्षी उपचारासाठी दाखल होत आहेत. निर्जलीकरणाचा त्रास झालेल्या पक्ष्यांवर उपचार करून त्यांना दोन दिवसांत सोडण्यात येते. तर जखमी पक्ष्यांना बरेच दिवस उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

हेही वाचा – महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…

पुढील काळामध्ये तापमान वाढल्यास याचा फटका पक्षी व प्राण्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर पाण्याची व्यवस्था करावी. – डॉ. मयूर डांगर, व्यवस्थापक,
दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल

निर्जलीकरणाचा त्रास झालेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था

निर्जलीकरणाचा त्रास झालेल्या पक्ष्यांना सलग दोन दिवस ग्लुकोजचे पाणी पाजण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही व्यक्ती आठ तासांत तीन ते चार वेळा या पक्ष्यांना ग्लुकोजचे पाणी पाजत आहे. तसेच त्यांची काळजी घेत आहेत.


मोठ्या जनावरांसाठी ही काळजी घ्या

निर्जलीकरणामुळे गायीला श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांच्या नाकाचा भाग सुकतो, तसेच त्यांचे डोळे बाहेर येतात. गाय, बैल, घोडा, म्हैस यांसारख्या मोठ्या जनावरांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या अंगावर गोण्या भिजवून टाकाव्यात. यामुळे त्यांना थंडावा जाणवतो.

हेही वाचा – रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश


अशी घ्या प्राण्यांची काळजी

तापमान वाढीचा परिणाम प्राण्यांवर होत असल्याने त्यांना उन्हाळ्यात घरामध्ये ठेवा. घरामध्ये ठेवणे शक्य नसेल, तर त्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवा. उष्ण हवामानात पिंजरे गरम होतात. त्यामुळे प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवू नये. प्राण्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवा. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या. उन्हात गरम झालेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी पिण्यास देऊ नका, यामुळे प्राण्यांना उष्णतेचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds suffer from rising heat more than 100 birds and animals admitted to hospital in 16 days mumbai print news ssb