महिला आणि बालकल्याण विकास विभागाचा चमत्कार
२४० रुपये किलो दराने आयुर्वेदिक पौष्टिक बिस्किटांची तर,
१६० रुपये किलो दराने नाचणी बिस्किटांची खरेदी
राज्यातील एकात्मिक बालविकास योजना काही ठेकेदारांसाठी चराऊ कुरण बनले आहे. अंगणवाडय़ांमधील दहा लाखांहून अधिक बालकांना पौष्टिक आहार देण्याच्या नावाखाली २४० रुपये किलो दराने आयुर्वेदिक आणि १६० रुपये किलो दराने नाचणीच्या बिस्किटांची तब्बल चौदा कोटी रुपयांची खरेदी एकाच वर्षांत करण्याचा चमत्कार महिला व बालकल्याण विकास विभागाने केला आहे.
ग्रामीण व नागरी भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटाच्या मुलांना १२.५ ग्रॅम प्रोटिन आणि पाचशे कॅलरीज मिळाव्यात यासाठी तब्बल चौदा कोटी रुपयांची बिस्किट खरेदी कितीतरी जास्त दराने खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या विभागाअंतर्गत ‘टेक होम रेशन ‘टीएचआर’ योजनेत ४.९२ रुपयांमध्ये लाखो बालकांना १२.५ ग्रॅम प्रोटिन आणि ५०० कॅलरीजचे खाद्यपदार्थ देण्यात येत होते. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका आदेशाचा फायदा घेत एकात्मिक बाल विकास विभागातील काही अधिकारी व ठेकेदारांनी संगनमताने बिस्किट खरेदीचे धोरण मंजूर करून घेतले. या धोरणाअंतर्गत शंभर ग्रॅमचा आयुर्वेदिक बिस्किट पुडा २४ रुपये ७५ पैसे या दराने तर १६ रुपये २० पैसे दराने नाचणीची बिस्किटे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील गंभीर बाब म्हणजे एकाच आदेशावर तीनवेळा खरेदी करण्यात आल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोटय़वधी रुपयांची बिस्किट खरेदी होणार असल्यामुळे बिस्किटाचे दर कमी असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध असलेल्या पार्ले ग्लुकोजच्या दराच्या तिप्पट ते चौपट दराने ही खरेदी करण्यात आली आहे. पार्ले ग्लुकोजच्या शंभर ग्रॅम बिस्किटाच्या पुडय़ातही एवढीच प्रथिने व कॅलरीज असतानाही त्याचा दर नऊ रुपये आहे हे लक्षात घेता काही कोटींचा भ्रष्टाचार या खरेदीत झाल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात ही बिस्किटे मुलांपर्यंत पोहचतात का? त्यांची चव व दर्जा राखण्यात आला आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकाच वर्षांत तीनदा बिस्किट खरेदी करून मुलांना खाऊ घालण्यासाठी उत्सुक असणारे अधिकारी कोण याचीही चौकशी व्हायला हवी असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा