मिठायांवर वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वर्खाविरोधात मुंबई महापालिकेने बंदी घातल्यामुळे मुंबईतील मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. चांदीच्या वर्खात होणाऱ्या भेसळीविरोधात पालिकेने मोहीम छेडली असली तरी पालिकेचे अधिकारी सरसकटपणे सर्वच चांदीचा वर्ख असलेल्या मिठायांवर कारवाई करत असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे, लाखोची मिठाई जप्त होण्याची भीती, ऐन दिवाळीत धंदा बुडण्याची चिंता व या पालिकाधिकाऱ्यांकडून होणारी लाचखोरी यांमुळे मिठाईवाल्यांची दिवाळी कडवट झाली आहे.
चांदीचा भेसळयुक्त वर्ख असलेली मिठाई आरोग्यास हानीकारक असल्याचे सांगत पालिकेने गेल्या आठवडय़ात एक परिपत्रकाद्वारे त्यावर बंदी घालण्याचे आणि  कारवाईचे आदेश दिले होते. या वर्खामुळे आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे बंदी घालावी, असे पत्र पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिल्याने आपण लोकांच्या आरोग्याचा विचार करून अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांना या संदर्भात पत्र पाठवल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. तर अन्न व औषध प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार निकृष्ट चांदीच्या वर्खाबाबात कारवाई करण्याचे आदेश आपण दिले, असे मनीषा म्हैसकर म्हणाल्या. मात्र, सरसरट चांदीच्या वर्खाच्या वापरावर कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या कारवाईमागे भारताचा पारंपरिक उद्योग संपवण्याचा कट असल्याचा आरोप मिठाईव्यापाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने दिवाळीपूर्वी पुरेशी मुदत देऊन तशी सूचना दिली असती तर हजारो किलो मिठाई आम्ही तयार केली नसती असे मिठाई दुकानदारांचे म्हणणे आहे. या घोषणेमुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी लूटमार सुरू केली आहे त्यावर कोण कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. मुळात चांदीचा वर्ख व अ‍ॅल्युमिनियम फॉइल यांचे मिश्रण होऊ शकत नाही. चांदीच्या वर्खात भेसळ करता येत नाही, असा दावा एका व्यापाऱ्याने केला.
मुंबईत ‘मुंबई मिष्ठान्न मंडळ’ ही मिठाई विक्रेत्यांची संघटना आहे. दिवाळीच्या काळात गुजरातमधून सुमारे २५ हजार किलो मावा मुंबईत येतो, तर मुंबईतही २० ते २५ हजार किलो माव्याची मिठाई बनवली जाते. प्रामुख्याने जयपूर व दिल्ली येथून चांदीचा वर्ख मुंबईत येतो व हा केवळ चांदीचाच वर्ख असतो. बर्फीच्या एका तुकडय़ावर वापरण्यात येणाऱ्या वर्खाची किंमत तीन ते चार रुपये असते. गेली चारपाच वर्षे पारंपरिक मिठाईला बदनाम करण्याचा पद्धतशीर उद्योग काही जणांकडून सुरू आहे. या बातम्यांमुळे अनेक कंपन्यांनी ऑर्डर रद्द केल्याने मिठाईवाल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेचे सचिव प्रदीप जैन यांनी सांगितले.

‘चांदीचा वर्ख’ म्हणजे नेमके काय?
* चांदीचा पातळ पत्रा करून त्याला चामडय़ाच्या अतिशय गुळगुळीत चपटय़ा तुकडय़ांमध्ये ठेवून ठोकतात. त्यातूनच अतिशय पातळ वर्ख तयार होतो. गुजरातमधून हा वर्ख मुंबईत येतो.
*  चांदीच्या महाग असल्याने अ‍ॅल्युमिनिअमचा उपयोग वर्खासाठी सुरू झाला.
* अ‍ॅल्युमिनिअमचा वर्ख कारखान्यातच यंत्राने तयार केला जातो.
* दोन्ही वर्ख अतिशय पातळ असतात, त्याला गंध, चव नसते त्यामुळे खाताना त्याचा फरक कळत नाही.
*  चांदीचा वर्ख हातावर घेतल्यावर विरघळतो तर अ‍ॅल्युमिनिअमचा वर्ख हाताला कागदासारखा चिकटतो़

मिठाई व्यावसायिकांच्या पदरी उच्च न्यायालयाकडूनही निराशाच!
मुंबई :आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थाना बंदी घालण्याचा वा त्या दृष्टीने कारवाई करण्याचा अधिकार परवाना देणारी यंत्रणा म्हणून पालिकेला अधिकार असल्याचे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने मिठाई व्यावसायिक संघटनेला मंगळवारी कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
पालिकेच्या कारवाईविरोधात श्री मुंबई मिष्ठान व्यावसायिक सहकारी मंडळाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. याचिकादारांच्या वतीने युक्तिवाद करताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर परंपरागत मिठाईंपासून लोकांना दूर ठेवण्याच्या हेतूने पालिकेने हे परिपत्रक काढल्याचा आरोप अ‍ॅड. अंजली पुरव यांनी केला. मात्र सणासुदीच्या दिवसांत मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मिठाई बाजारात आणली जाते. चांदीचा भेसळयुक्त वर्खही आरोग्याला अपायकारक असल्यानेच जनहित म्हणून पालिकेकडून ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा अ‍ॅड. सुरेश पाकळे आणि अ‍ॅड. पुराणिक यांच्याकडून करण्यात आला. त्यांची ही बाजू मान्य करीत प्रथमदर्शनी तरी पालिकेकडून केली जाणारी कारवाई योग्य आणि जनहितार्थ असल्याचे आणि तसे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, हे न्यायालयाने स्पष्ट केले.  

 ‘वर्खात असुरक्षित आढळले नाही!’
मिठायांवरील वर्खाबाबतचे परिपत्रक पालिकेने काढले आहे. त्याच्याशी अन्न व औषध प्रशासनाचा काहीही संबंध नाही. मात्र, नेहमीप्रमाणे मिठायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या खवा, रंग, चांदीचा वर्ख आदी गोष्टींच्या दर्जाबाबत आमची तपासणी सुरूच आहे. वर्खात ९९.९९ टक्के शुद्ध चांदी असावी असे मानक आहे. काही वेळा चांदीच्या वर्खाऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख वापरला जातो, असे आढळून येते. त्यामुळे सणासुदीच्या काळात आम्ही विशेषत्वाने तपासणी करत असतो. नमुने घेत असतो. गेल्या काही दिवसांत घेतलेल्या नमुन्यांमध्ये आतापर्यंत तरी काही आढळलेले नाही.
– सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई, अन्न व औषध प्रशासन.

लोकांच्या घरी वर्षांनुवर्षे अ‍ॅल्युमिनिअमच्या भांडय़ात स्वयंपाक होत आहे. त्यामुळे हा धातू जेवणात मिसळला जात असेलच. मात्र त्यामुळे कोणाला काही त्रास झाल्याचे दिसलेले नाही. अर्थात वर्खातील अ‍ॅल्युमिनिअममधील शरीराला घातक ठरणारे घटक बाजूला करणे आवश्यक आहे.
– वैद्य राजीव कानिटकर

Story img Loader