मिठायांवर वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वर्खाविरोधात मुंबई महापालिकेने बंदी घातल्यामुळे मुंबईतील मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. चांदीच्या वर्खात होणाऱ्या भेसळीविरोधात पालिकेने मोहीम छेडली असली तरी पालिकेचे अधिकारी सरसकटपणे सर्वच चांदीचा वर्ख असलेल्या मिठायांवर कारवाई करत असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे, लाखोची मिठाई जप्त होण्याची भीती, ऐन दिवाळीत धंदा बुडण्याची चिंता व या पालिकाधिकाऱ्यांकडून होणारी लाचखोरी यांमुळे मिठाईवाल्यांची दिवाळी कडवट झाली आहे.
चांदीचा भेसळयुक्त वर्ख असलेली मिठाई आरोग्यास हानीकारक असल्याचे सांगत पालिकेने गेल्या आठवडय़ात एक परिपत्रकाद्वारे त्यावर बंदी घालण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले होते. या वर्खामुळे आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे बंदी घालावी, असे पत्र पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिल्याने आपण लोकांच्या आरोग्याचा विचार करून अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांना या संदर्भात पत्र पाठवल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. तर अन्न व औषध प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार निकृष्ट चांदीच्या वर्खाबाबात कारवाई करण्याचे आदेश आपण दिले, असे मनीषा म्हैसकर म्हणाल्या. मात्र, सरसरट चांदीच्या वर्खाच्या वापरावर कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या कारवाईमागे भारताचा पारंपरिक उद्योग संपवण्याचा कट असल्याचा आरोप मिठाईव्यापाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने दिवाळीपूर्वी पुरेशी मुदत देऊन तशी सूचना दिली असती तर हजारो किलो मिठाई आम्ही तयार केली नसती असे मिठाई दुकानदारांचे म्हणणे आहे. या घोषणेमुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी लूटमार सुरू केली आहे त्यावर कोण कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. मुळात चांदीचा वर्ख व अॅल्युमिनियम फॉइल यांचे मिश्रण होऊ शकत नाही. चांदीच्या वर्खात भेसळ करता येत नाही, असा दावा एका व्यापाऱ्याने केला.
मुंबईत ‘मुंबई मिष्ठान्न मंडळ’ ही मिठाई विक्रेत्यांची संघटना आहे. दिवाळीच्या काळात गुजरातमधून सुमारे २५ हजार किलो मावा मुंबईत येतो, तर मुंबईतही २० ते २५ हजार किलो माव्याची मिठाई बनवली जाते. प्रामुख्याने जयपूर व दिल्ली येथून चांदीचा वर्ख मुंबईत येतो व हा केवळ चांदीचाच वर्ख असतो. बर्फीच्या एका तुकडय़ावर वापरण्यात येणाऱ्या वर्खाची किंमत तीन ते चार रुपये असते. गेली चारपाच वर्षे पारंपरिक मिठाईला बदनाम करण्याचा पद्धतशीर उद्योग काही जणांकडून सुरू आहे. या बातम्यांमुळे अनेक कंपन्यांनी ऑर्डर रद्द केल्याने मिठाईवाल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेचे सचिव प्रदीप जैन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा