लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १० उमेदवारांची यादी तयार झाली असून प्रदेश सुकाणू समितीने या नावांची शिफारस केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. या यादीत नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, खासदार हंसराज अहिर, रावसाहेब दानवे आदींचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील जागांवर चर्चा अजून झाली नसली तरी एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली असून उमेदवार निवडीसाठी सुकाणू समितीची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा समितीत समावेश आहे.
गोपीनाथ मुंडे हे बीड, तर नितीन गडकरी नागपूर, अहिर – चंद्रपूर, दानवे जालन्यातून, दिलीप गांधी नगरमधून, नाना पटोले भंडारा-गोंदियातून निवडणूक लढतील.
केंद्रीय समितीची मान्यता आठवडाभरात मिळण्याची शक्यता आहे. भाजप २६ जागा लढविणार असल्या तरी स्वाभिमान संघटना आणि रिपब्लिकन पक्षासाठी काही जागा सोडाव्या लागतील. एक-दोन जागांची अदलाबदल करावी लागेल. त्या जागांचा विचार पुढील टप्प्यात केला जाणार आहे.

Story img Loader