विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अपेक्षेप्रमाणे भाजपाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकार विरोधात आंदोलन केले, जोरदार घोषणाबाजी केली. यामधे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे आमदार सहभागी झाले होते. आरोग्य विभाग व म्हाडा भरती परिक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केला जात असल्याबद्द्लही भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान या आंदोलनाआधी विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाच्या आमदारांनी अभिवादन केले. तर महाविकास आघाडीमधील मंत्री आणि आमदारांनीही शिवाजी महाराजांना अभिवादन करत विधिमंडळात प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळात उपस्थित रहाणार का, कामकाजात सहभागी होणार का याची चर्चा अधिवेशनात सुरु आहे.