महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी तीव्र करण्यासाठी पावले टाकली असून राज्यभरात १०० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत, तर २५०-३०० मुस्लीम धर्मीयांना गोवंशाची कत्तल केल्याबद्दल अटक झाली आहे, तर गोमांसाची होणारी चोरटी निर्यात रोखण्यासाठी केंद्र सरकार मुंबईत तपासणीसाठी प्रयोगशाळा उघडणार असून भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान, पोलीस गुन्हे दाखल करीत असले तरी गोवंशाची बेकायदा कत्तल मोठय़ा प्रमाणावर सुरूच असून गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सरकार पावले टाकणार असल्याचे गृह विभागातील उच्चपदस्थांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून दादरी येथे झालेल्या हत्येनंतर सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे; पण अन्य काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गोवंश हत्याबंदी कायदा भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ३ मार्चपासून लागू केला असून गोवंशाची हत्या करणाऱ्यांवर राज्यात कारवाई सुरू आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी मुस्लीम असून ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल्स’ यांसारख्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटना पोलिसांकडे तक्रारी करून गोवंशाच्या कत्तली रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांची ही संघटना आहे. या संघटनेने सोलापूर, बीड, संगमनेर, कल्याण, मुंब्रा, ठाणे, विक्रोळी आदी ठिकाणी १० पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंदविल्या असल्याची माहिती संस्थेचे राज्यप्रमुख चेतन शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली; पण या आरोपींना लगेच जामीन मिळत असल्याने कायदा करूनही बेकायदा कत्तली सुरूच असून आरोपींना कडक शासन होण्यासाठी सरकारने पावले टाकली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहमदनगर, बीड, ठाणे, रायगड, मुंबई आदी जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अवैध गोवंशाची कत्तल सुरूच आहे आणि त्या करणाऱ्यांवर अनेक गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोमांसाची निर्यातही मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर होत असून ती रोखण्यासाठी किरीट सोमय्या गेले काही महिने प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी विभागाकडेही त्यांनी पाठपुरावा केला आहे. कृषी राज्यमंत्री संजीव बलयान यांनी ‘अ‍ॅग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (अपेडा)’ च्या पदाधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा करून गोमांसाची चोरटी निर्यात रोखण्यासाठी मांसाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी मुंबईत प्रयोगशाळा उघडण्याचे ठरविले आहे.

Story img Loader