विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या ३० तारखेला होणाऱ्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजप किती मित्र पक्षांना जागा सोडते हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेला एक जागा सोडावी लागणार असून, भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे महादेव जानकर, विनायक मेटे हे आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत.
पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची विधानसभेवर निवड झाल्याने तर विनायक मेटे यांना अपात्र ठरविण्यात आल्याने विधान परिषदेच्या रिक्त चार जागांसाठी ३० तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. तावडे आणि शेलार यांच्या राजीनाम्याने रिक्त जागा भरण्याकरिता दोन स्वतंत्र पोटनिवडणुका होतील. चव्हाण आणि मेटे यांची मुदत एकाच वेळी संपत होती. यामुळे या दोन जागांसाठी एकत्रित निवडणूक होईल. म्हणजेच चार जागांसाठी तीन स्वतंत्र निवडणुका एकाच दिवशी होणार आहेत. तावडे आणि शेलार यांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतांचा कोटा नसेल. सर्वाधिक मते मिळणारा निवडून येईल. चव्हाण आणि मेटे यांच्या रिक्त जागांसाठी होणारी निवडणूक कोटा पद्धतीने होईल. दोन जागा असल्याने विजयाकरिता प्रथम पसंतीच्या ९६ मतांची आवश्यकता भासेल.
भाजपचे १२१ आणि शिवसेना ६३ यासह छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता सत्ताधाऱ्यांकडे १९०च्या आसपास मते आहेत. म्हणजेच दोन जागांसाठी मतदान झाले तरीही भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. चारही जागा सत्ताधारी युतीला मिळणार आहेत.

कोणत्या मित्र पक्षाला खुश करणार ?
रिपब्लिकन आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तसेच विनायक मेटे यांची संघटना या चार जणांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या चारही मित्रपक्षांना सत्तेत वाटा देण्याची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली होती. मंत्रिमंडळातील सुभाष देसाई हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. परिणामी त्यांना निवडून आणावे लागेल. महादेव जानकर यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. धनगर समाजाची मते लक्षात घेता भाजप त्यांना सामावून घेण्याची शक्यता आहे. रामदास आठवले स्वत: मंत्रिपद स्वीकारण्यास तयार असल्यास त्यांच्यासाठी विधान परिषदेची जागा देण्याची भाजपची तयारी आहे. विनायक मेटे यांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मात्र त्यांना संधी मिळणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. शिवसेनेला एक जागा सोडावी लागणार आहे. जानकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्यास त्यांनाही विधान परिषदेवर निवडून आणावे लागेल. चारपैकी दोन जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्यास भाजपच्या वाटय़ाला फक्त दोन जागा येतील. भाजपमध्ये विधान परिषदेवर जाण्यास डझनभर नेते इच्छुक आहेत.

शिवसेनेची कोंडी ?
चारपैकी दोन जागांची मुदत जुलै २०१६ पर्यंत आहे. म्हणजेच निवडून येणाऱ्या दोघांना पुढील वर्षी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. या दोन जागा मित्र पक्षांच्या गळ्यात मारून त्यांना पुन्हा दबावाखाली ठेवण्याची भाजपची योजना असू शकते.

Story img Loader