मुंबई : भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज, शनिवारी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तर हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या वतीने उद्याच मुंबईत ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन होणार असून ठाणे व डोंबिवलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे. सत्ताबदल झाल्यानंतर विरोधी बाकावर बसायला लागलेल्या महाविकास आघाडीचे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील हे पहिलेच मोठे शक्ती प्रदर्शन असेल. त्याची तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी केली असून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची ताकद व एकजूट दाखविण्याची चांगली संधी यानिमित्ताने आघाडीला मिळणार आहे. डावे पक्ष, शेकापसह काही समविचारी पक्षांचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे शनिवारीच भाजपनेही ‘माफी मांगो’ आंदोलनाची हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्थ मुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून ‘माफी मांगो’ आंदोलन केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीरामचंद्र व श्रीकृष्णांचा उपमर्द केला असून संत ज्ञानेश्वर, एकनाथ यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करुन वारकरी संप्रदायाचाही अपमान केला आहे. त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत असून त्यामुळे आंबेडकरप्रेमींच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. – आशिष शेलार</strong>, अध्यक्ष, मुंबई भाजप