मुंबई : सरकार व पक्षात समन्वय राहावा आणि पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शासनदरबारी असलेली कामे मार्गी लागावीत यांसाठी भाजप कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांच्या भाजप मंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकपदी नियुक्त्या करण्यास सुरुवात झाली आहे. स्वीय साहाय्यकांशी समन्वय ठेवण्यासाठी सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४-१९ या कार्यकाळात काही संघ स्वयंसेवक व भाजप कार्यकर्ते मंत्री कार्यालयात काम करीत होते. मात्र त्या वेळी बऱ्याचशा नियुक्त्या या वैयक्तिक पातळीवर झाल्या होत्या आणि त्यांचे पद शासकीय किंवा वेतन शासनाकडून मिळत नव्हते. मंत्र्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्री कार्यालयास तपशील मिळत होता. फडणवीस यांनी या कार्यकाळात पक्ष किंवा संघाचा एक कार्यकर्ता-पदाधिकारी मंत्री कार्यालयांत नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. मंत्र्यांकडून प्रस्ताव आल्यावर त्याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात येत आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis: ९८ गुंतवणूक विदेशी, दावोसमधील करारांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा
कामे काय?
अनेक पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष मंत्रालयात आपल्या कामांसाठी संबंधित नागरिकांना घेऊन येतात. तेव्हा काही वेळा मंत्रालयात किंवा विधान भवनात प्रवेशाचे पास मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे पक्षामार्फत येणाऱ्याच्या अडचणींमध्ये मदत करून त्यांना मंत्र्यांची किंवा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घालून देणे, त्यांचा प्रश्न मार्गी लावणे, फायलीच्या मंत्रालयीन प्रवासाचा पाठपुरावा करणे, आदी कामे या स्वीय साहाय्यकांकडून केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्र्याकडे भाजपचा कार्यकर्ता ‘विशेष अधिकारी’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक प्रत्येक मंत्र्याकडे विशेष कार्य अधिकारी राहणार काय या पत्रकारांच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक काळामध्ये जनतेला अनेक आश्वासने दिले. त्याच्या पूर्ततेसाठी प्रत्येक मंत्र्याकडे भाजपचा एक कार्यकर्ता विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्त होईल. प्रत्येक १५ दिवसांत प्रत्येक मंत्री पक्ष कार्यालयात एक जनता दरबार घेईल. तर मंत्री प्रत्येक पंधरा दिवसांत एका जिल्ह्यात मुक्कामी राहतील. तर प्रत्येक जिल्ह्यात एक भाजपचा संपर्कमंत्री राहील. त्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न राहील.
हेही वाचा : वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
शासनाकडून वेतन
काही संघ व भाजप कार्यकर्त्यांनी मंत्र्यांशी संपर्क केला असून स्वीय साहाय्यक म्हणून नियुक्तीसाठी विनंती केली आहे. त्यापैकी योग्य व्यक्तींची निवड मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. पक्ष किंवा संघ कार्यकर्त्याला स्वीय साहाय्यकाची नियुक्ती मिळाल्यावर शासनाकडून वेतन दिले जाईल. भाजपच्या १९ मंत्र्यांकडे पक्षामार्फत नियुक्त झालेल्या स्वीय साहाय्यकांची यादी पक्ष कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याशी संपर्कात राहून पक्षाची कामे मार्गी लावण्याच्या सूचना देऊळगावकर यांना बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.