शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून टीका केल्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी माणसाला गाडा, आपला मॉल माचवा हे तुमचं मिशन असल्याची टीका केली आहे.
शिवसेनेने मिशन मुंबईवरुन भाजपावर टीका केली असून गंभीर आरोप केले आहेत. “शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. “पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असा इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे.
आशिष शेलारांचं प्रत्युत्तर –
“दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता…पालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या? सचिन वाझेला वसुलीला कोणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कोणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले?,” अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.
“फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?,” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी विचारला आहे.
पुढे ते म्हणालेत की “महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले…तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उद्ध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्ष मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे…आता म्हणे पुढे चला? कुठे वसई की विरार? की आणखी त्याच्यापण पुढे”.
हे मिशन नव्हे कमिशन असा आरोप करताना आशिष शेलार म्हणालेत की, “कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू’राजां’नी वेगळी चूल मांडली. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले. वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच…स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?”.
नाचता येईना अंगण वाकडे, स्वत:चे अपय़श झाकायला आता पर्याय तोकडे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.