अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे गटात होणारे आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी अद्यापही सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; ‘अंधेरीतील माघार’ या विषयावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चेची शक्यता
ठाकरे गटाची भाजप-शिंदे गटावर टीका
“अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मानांना बसला आहे. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
हेही वाचा – माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना खासदाराचं पत्र
आशिष शेलारांनी काय दिलं प्रत्युत्तर?
“सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!”, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी सामनातील टीकेला प्रत्त्युतर दिले आहे.
“भाजपाने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेग्विन सेना..घरात बसून “गणपत वाण्या” सारखी नुसतीच स्वप्न बघणार”, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.