मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावरून विरोधकांकडून तीव्र टीका केली जात असून भाजपानं त्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
“लोक हो..तुम्ही जाणताच!”
आशिष शेलार यांनी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. “आा निवडणूक जवळ येताच ५०० चौ.फु. घरांना कर माफ! या घोषणेचा पाऊस काल मुबईत पडला. मग ठाणे, नवी मुंबईकडून हे मतलबी वारे राज्यात पुढे सरकू लागलेत. लोक हो! तुम्ही जाणताच… प्रिंटिंग मिस्टेकवाल्यांची संगत बरी न्हाय! निवडणूक मुहूर्तावरच्या घोषणेची खात्री काय?” असं आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.
काँग्रेसलाही टोला!
दरम्यान, शिवसेनेसोबतच आशिष शेला यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला आहे. “काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात घोषणा केल्या आणि सत्ता आल्यावर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगून वारंवार हात झटकले.. मग तो विषय झोपडपट्टी नियमित करायचा असो, मोफत वीज देण्याचा असो वा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा असो…६० वर्षे घोषणा..फसवणूक आणि प्रिंटींग मिस्टेक..बस्स”, असं आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी नगरविकास खात्याच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ५०० चौरस फूटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
“मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता नवीन मित्र सोबत आले आहेत. तिघे मिळून आपण पुढे जात आहोत. इतर पक्ष आम्ही हे करु असे म्हणतात आणि कालांतराने तेही विसरतात आणि लोकसुद्धा विसरतात. खोटं बोलायचं नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे. जे जमणार नसेल ते निवडणुक जिंकण्यासाठी उपयोगी पडणार असेल तरीसुद्धा खोटं वचन द्यायचं नाही ही आपली परंपरा आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.