करोनाची स्थिती आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे सर्वच सतर्क झाले असून नागरिकांमध्ये देखील काहीसं भितीयुक्त चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता आता खुद्द पालिका आयुक्तांनीच फेटाळून लावली आहे. मात्र, मुंबईतील करोनाची स्थिती अधिक चिघळू न देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असल्याचं विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. या विधानावरून आता भाजपाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील करोनाच्या स्थितीबाबत आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये माहिती दिली. “सध्याच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यावर धावपळ होईल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घिसाडघाईने निर्णय घेणारे नाहीत. ते (करोनाला) धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”, असं महापौर पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या. यावरून आता भाजपानं प्रतिक्रिया दिली आहे.

ओमायक्रॉनबाबत पालिका आयुक्तांचा गंभीर इशारा; म्हणाले, “मुंबईकडे बघून निवांत राहू नका, नाहीतर…!”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्री नेमकं काय करणार? घरी बसून गनिमी काव्याने करोनाच्या छाताडावर चढून त्याचा कोथळा काढणार की त्याला नोटीस पाठवून पोलीस कारवाई करणार?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

मुंबई आणि राज्यभरातील करोनाच्या स्थितीवरून देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मग ती दोन्ही बाजूच्या राजकीय कार्यक्रमात होणारी गर्दी असो वा खासगी कार्यक्रमात. या पार्श्वभूमीवर करोनाचे नियम फक्त सामान्य माणसांनाच आहेत का? असा सवाल समाजमाध्यमांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत – किशोरी पेडणेकर

मुंबईत लॉकडाउनची गरज नाही

दरम्यान, मुंबईत १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस तर ९० टक्के नागरिकांना दुसरा डोस देऊन झाला आहे. त्यामुळे मुंबई परिस्थिती नियंत्रणात असून लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलं आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचे बेड आणि ऑक्सिजनचा वापर किती आहे, या निकषांच्या आधारावर भविष्यात लॉकडाऊनसंदर्भातला निर्णय होऊ शकतो, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp atul bhatkhalkar mocks mayor kishori pednekar on cm uddhav thackeray corona pmw
Show comments