दहीहंडी उत्सव जल्लोषातच साजरा होणार, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असतानाच भाजपनेही गोविंदा मंडळांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून उत्सवावरील र्निबध दूर करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली आहे. तर दहीहंडीला क्रीडाप्रकाराचा दर्जा देऊन गोिवदांना क्रीडापटूंच्या सवलती मिळाव्यात, अशी मागणी खासदार पूनम महाजन यांनी केंद्रीय क्रीडा व युवक खात्याच्या मंत्र्यांकडे केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुंबई भाजपच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली असून र्निबधातून कायमस्वरूपी दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यावर पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता असून गोविंदा मंडळांची बाजू ऐकली जाईल. उत्सवाचा इव्हेंट होऊ नये, अशीच भाजपची भूमिका असली तरी र्निबध अडचणीचे असल्याचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.