विधान परिषद निवडणुकीत दोन अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या भाजपकडून शुक्रवारी दोन्ही अर्ज मागे घेण्यात आले. प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही तासांतच अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेल्या मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला. यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विधान परिषदेच्या १० जागांकरिता आता १२ अर्ज दाखल होते. संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. पण भाजपने सहा अधिकृत तर एका अपक्षाला रिंगणात उतरविले होते. त्यापैकी प्रसाद लाड यांनी माघार घेतली. त्यानंतर मनोज कोटक यांनीही माघार घेतली. दिल्लीभेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी विधान परिषद निवडणुकीबाबतही चर्चा केली होती.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी किंवा भाजपचा एक उमेदवार अडचणीत येऊ शकतो. भाजपने उपसभापतीपदाच्या बदल्यात माघार घेण्याची तयारी दर्शविली होती. म्हणजेच सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नेत्याची निवड झाल्यावर उपसभापतीपद भाजपला देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने द्यावे, अशी भाजपची मागणी असल्याचे समजते.
दरम्यान, उमेदवारीवरून भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंग या बाहेरून आलेल्यांना पक्षाने उमेदवारी दिली. दरेकर यांच्यावर मुंबै बँक घोटाळ्याचा आरोप आहे. सिंग यांना आयात करून उमेदवारी दिल्याने पक्षातील उत्तर भारतीय नेते संतप्त झाले आहेत.
भाजप उमेदवार
प्रवीण दरेकर
आर. एन. सिंग
सुरजितसिंह ठाकूर
विनायक मेटे
सदाभाऊ खोत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा