छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्यांचे हे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपाच्या वतीने दक्षता समिती स्थापन करण्यात आली असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ही समिती गडाचे वैभव अबाधित राखून सर्व गैरप्रकार हाणून पाडेल असं ते म्हणाले आहेत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरला कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरु झाला आहे. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू आहेत”.
“गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करुन गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपाच्या या दक्षता समितीचे अध्यक्ष माढाचे खासदार रणजीतसिंह हिंदुराव निंबाळकर असणार आहेत. तसंच खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे आणि सांगलीचे माजी आमदार नितीनराजे शिंदे सदस्य आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर समितीचे मार्गदर्शक असतील.