मुंबई : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत व त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

या संदर्भात पाटील म्हणाले,  या डायरीत कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहीत नाही. पण आता चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले, तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. हा उल्लेख ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाबत आहे की अन्य कोणाविषयी आहे, हा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँडिरग) प्रकार असून त्याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवडय़ापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाकाळात ३८ मालमत्ता खरेदी करुन ३०० कोटी रुपये  यशवंत जाधव यांनी मिळविले आहेत. जनतेचे लुटलेले पैसे  मुंबईकर जनतेला परत मिळाले पाहिजेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार उघड

नागपूर : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदींबाबत माहिती नाही, पण या नोंदींची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असून त्यातून महापालिकेचा भ्रष्टाचार उघड होईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले. २४ महिन्यांत ३८ मालमत्ता जाधव यांनी खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. ही सर्व खरेदी करोनाकाळात झाली. याचा अर्थ महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे हे स्पष्ट होते. जाधव यांची प्राप्तिकर विभाग चौकशी करत आहे. त्यातून महापालिकेतील इतरही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील, असे फडणवीस म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil demanded inquiry against shiv sena leader yashwant jadhav by ed zws