राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणं साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असं स्वाभाविक आहे, कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत असं विचारलं असता त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा असा टोला लगावला.
पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत ते दिसलं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला असून तो मंत्रालयापर्यंत येत आहे. एका मंत्र्याचं नाव अस्पष्टपणे यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस कसा तपास करू शकणार ? त्यामुळे CBI ची मागणी केली आहे. लोकशाहीत आम्हाला काही मागण्याचा तरी अधिकार आहे की नाही? की आमचं तोंड दाबून ठेवणार आहात”.
सामनामधील टीकेला उत्तर
“स्वप्न तेव्हा पडतं जेव्हा ते व्यवहारात येऊ शकत नसतं. राष्ट्रपती राजवट येणं काही स्वप्न असून शकत नाही. राजवट येण्यासाठीची सर्व कारणं पूर्ण झाली आहेत. ती आणायची की नाही हा केंद्राचा विषय आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“मोदींचं मुखदर्शन झालं नसलं तरी ते सगळ्या बाजूने अॅक्टिव्ह”
मुख्यमंत्री राज्यात दिसत नसल्याच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी मोदींचं मुखदर्शन झालं नसल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मोदींचं मुखदर्शन झालं नसलं आणि ते संसदेत आले नसले तरी ते सगळ्या बाजूने अॅक्टिव्ह आहेत. ते सहीसाठी, लोकांसाठी उपलब्ध नाहीत असं नाही. राज्य शासन विना मुख्यमंत्री चालणार नाही हा माझा मुद्दा आहे. तुम्ही लोक, आमदार, सही कशासाठीच उपलब्ध नाही”.