गेल्या काही दिवसांपासून नाशिक विधानपरिषद उमेदवारीवरून राज्याच्या राजकीय वातावरणात जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खळबळ उडाल्यानंतर आता त्यासंदर्भात पक्षाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाकडून या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया दिली आहे.
“सत्यजीत तांबेंनी समर्थन मागितलं तर…”
सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात सत्यजीत तांबेंना भाजपाने पाठिंबा दिल्याचीही चर्चा सुरू झाली होती. त्यावर बोलताना बावनकुळेंनी अद्याप त्यासंदर्भात निर्णय झाला नसल्याचे संकेत दिले. “सत्यजीत तांबेंनी अजून कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. त्यांनी समर्थन मागितलं, तर केंद्रीय संसदीय समितीकडे तशी संमती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असं म्हणत बावनकुळेंनी भाजपा तांबेंच्या पाठिशी उभी राहण्याची शक्यता अधोरेखित केली. तसेच, “भाजपा सध्या अपक्षाच्या भूमिकेतच आहे. आमचं समर्थन कुणाला असणार आहे, हे काळ ठरवेल”, असंही ते म्हणाले.
मोदींच्या दौऱ्याची ‘सामना’मध्ये जाहिरात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. या दौऱ्याची जाहिरात ‘सामना’ वर्तमानपत्रात आल्यावरून चर्चा सुरू झाली होती. त्यावरून बावनकुळेंनी खोचक शब्दांत टोला लगावला. “सामना हे त्यांचं घरगुती वृत्तपत्र आहे. या चित्रपटात दिग्दर्शक तेच आहेत. निर्माते तेच आहेत. वाचणारे आणि पाहणारेही तेच आहेत. त्यामुळे तो घरगुती चित्रपट झालाय. जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्रात जात असते. त्यामुळे जाहिरातीचा आणि बातम्यांचा काही संबंध नाही. कोणत्याही विचारांचं वर्तमानपत्र असलं, तरी त्यांना जाहिरात जात असते. त्यात विचार करण्यासारखं काही कारण नाही”, असंही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्यावरून बोलताना बावनकुळेंनी मविआला खोचक शब्दांत टोला लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडीचे एक दिल के टुकडे हुए हजार, कही कहा गिरा, कही कहा गिरा’, अशी अवस्था झाली आहे”, असं बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसमध्ये छोटे कार्यकर्ते अस्वस्थ?
यावेळी काँग्रेसवरही त्यांनी तोंडसुख घेतलं. “काँग्रेसमध्ये बूथ लेव्हलपर्यंत कुणी काम करायला तयार नाही. नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांना हे समजलंय की २०४७पर्यंत काँग्रेसला काही चांगले दिवस नाही. त्यामुळे ३०-३० वर्ष काँग्रेसमध्ये राहून कुणालाही आयुष्य खर्ची घालायचं नाहीये. तिथे आजही हीच परिस्थिती आहे की नेत्याचा मुलगाच काँग्रेसचा आमदार होऊ शकतो. मंत्र्याचा मुलगाच मंत्री होऊ शकतो. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार होऊ शकतो. अजूनही नेते आपापल्या मुलांना प्रमोट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत”, असं बावनकुळे म्हणाले.