राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना सातत्याने दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादाची धार चांगलीच वाढली आहे. आज भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रमुख संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशातील इतर बड्या नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा अनाठायी असल्याचा जावईशोध लावला आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यातून शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हा विषय तुम्हाला कितपत कळेल, माहिती नाही”

दरम्यान, “खरंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मोदी परखड भूमिका घेत असतात. अशा वेळी त्यांची सुरक्षा हा राष्ट्रीय विषय आहे. पण हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला तो कितपत कळेल, माहिती नाही. तरी आपल्या वाटत असेल की हा खर्च अनाठायी आहे, तर याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली तर काय हरकत आहे? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे बाहेर जात नाहीत. एक तर ते वर्षावर असतात किंवा मातोश्रीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा फारसा काही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातून एक आदर्श करून देऊ शकतो”, असा उपरोधिक सल्ला देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.

“आपलं ज्ञान…”

“आपलं राष्ट्रीय पातळीवरचं अस्तित्व बिहार निवडणुकीतून जनतेसमोर आलं आहे. त्यामुळे देशाची काळजी करण्यासाठी मोदी समर्थ आहेत. आपण आपलं ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणणं फार गरजेचं आहे. रेल्वे बंद आहेत. लोकांना त्रास होतोय, हेलपाटे मारावे लागत आहेत. जरा पाऊस पडला की मुंबईची तुंबई होतेय. या समस्येवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं गरजेचं आहे”, असं चित्रा वाघ यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

संजय राऊत म्हणतात, “विटंबना की विडंबना…!”

एकीकडे चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपा सरकारवर टीका केली आहे. सामनाच्या रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाविषयी भूमिका मांडली आहे. “विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच, तर भारतीय जनता पक्षाचे १६० आमदार बाद होतील. कारण या आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. खासदार रवी किशन हे लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाचे खासगी विधेयक मांडून चर्चा घडवणार आहेत. पण स्वत: रवी किशन यांनाच चार अपत्ये आहेत. आता काय करायचे?” असा सवाल त्यांनी केला आहे.