राज्याच्या विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नरहरी झिरवळ यांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्षपद भूषवणाऱ्या भास्कर जाधवांसोबत भाजपाच्या आमदारांच्या झालेल्या बाचाबाचीचं प्रत्यंतर भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनामध्ये झालं. मात्र, या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध शिवसेना असा आरोप-प्रत्यारोपाचा वाद सुरू झाला आहे. १२ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून भाजपाला २०१७ साली केलेल्या १९ आमदारांच्या निलंबनाची आठवण करून दिली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य करताना चित्रा वाघ यांनी थेट अफजल खानाचीच उपमा दिली आहे.
“प्रस्थापितांच्या पोपटाला…!”
“लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय, यावरूनच कळतं की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यासोबतच, “अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला. पण तुम्ही हे विसरलात की जनतेचं चिलखत आम्ही परिधान केलं आहे. माका तुका हा सांगुचा हा, अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय. लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल”, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.
अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही हे विसरलात की जनतेच चिलखत आम्ही परिधान केलंय… माका तुका हा सांगुचा हा..अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय…लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल (2/2)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 6, 2021
संजय राऊतांनी करून दिली १९ आमदारांची आठवण!
दरम्यान, १२ आमदारांच्या निलंबनानंतर गोंधळ घालणाऱ्या भाजपा आमदारांना संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईची आठवण करून दिली. “भाजपा १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत आंदोलन करत आहे. पण प्रिय देवेंद्रजी, तुम्ही त्याच विधानभवनात २२ मार्च २०१७ रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करणं कसं विसरू शकता? हिंमत दाखवा आणि सांगा की तुमचा १९ हा स्कोअर १२ पेक्षा जास्त आहे”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. त्याच्याच आधारे चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
BJP are protesting the suspension of 12 MLAs for unruly behaviour. Dear Devendraji how can you forget passing a resolution in the same Assembly on 22, March 2017 to suspend 19 MLAs ( Congress and NCP) for unruly conduct. be brave and say your score of 19 is higher than 12
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2021
Exclusive Interview : अधिवेशनात नक्की घडलं काय?; सांगतायत भास्कर जाधव
गळाभेट झाली, फडणवीसांनी सांगितलं हकीगत!
अध्यक्षांच्या दालनामध्ये गोंधळ घालणाऱ्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय झालं होतं, याची माहिती सभागृहात दिली होती. “भाजपाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर मी स्वत: त्यांना मागे सारलं. त्यानंतर त्यांनी भास्कर जाधव यांची माफी देखील मागितली. हे सगळं मिटल्यानंतर सर्व आमदार अध्यक्षांच्या दालनाबाहेर पडण्यापूर्वी भास्कर जाधवांसोबत त्यांची गळाभेट देखील झाली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.