कुळगाव-बदलापूर नगरपालिकेसाठी नवीन प्रशासकीय भवन उभारण्यासंदर्भात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बोगस निविदा सूचनेप्रकरणी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी, भाजपचे नगरसेवक राम पातकर, माजी नगरसेवक मिलिंद नार्वेकर यांना पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
निविदा सूचनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळुमामा सूर्यराव यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेचे दोन माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, साहाय्यक संचालक नगररचनाकार, अभियंता, जाहिरात एजन्सीचा चालक अशा एकूण १८ जणांवर गेल्या आठवडय़ात गुन्हा दाखल केला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे रेल्वे स्थानकाजवळ स्वत:चे प्रशासकीय भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या इमारतीच्या उभारणीसाठी पालिकेने निविदा सूचना तयार केली होती. ही सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करताना निविदेमधील मूळ मजकुरात फेरबदल करून बोगस पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गेल्या आठवडय़ात गुन्हा दाखल झाला होता. विधिमंडळातही याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. उर्वरित १६ आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बागल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा