केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची भाजपकडून समजूत घालण्यात आली. योग्य वेळी पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेतले जाईल, असे भाजप नेतृत्वाकडून आश्वासन देण्यात आल्याचे समजते. केंद्रीय मंत्रिमंडळाचा एवढय़ात विस्तार आता होणार नाही, मात्र, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी रिपाइंचा विचार केला जाईल, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याच्या बदल्यात आठवले यांना केंद्रात मंत्रिपद व राज्यात रिपाइंचा सत्तेत सहभाग असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आठवले यांचा विचार केला गेला नाही. त्याबद्दल रिपाइंकडून केवळ नाराजीच नव्हे तर भाजपचा निषेधही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे भाजपमध्येही थोडी चलबिचल झाली होती. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदास आठवले यांची अलीकडेच भेट झाली. त्यावेळी आपणास नाराज करणार नाही, अशी फडणवीस यांनी आठवले यांची समजूत काढल्याचे समजते. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे रिपाइंचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून आठवले यांची समजूत
केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची भाजपकडून समजूत घालण्यात आली.

First published on: 16-11-2014 at 03:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp counsels ramdas athawale