स्वामी विवेकानंदांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या सर्वधर्मपरिषदेतील सहभागास १२० वर्षे आणि जयंतीस १५० वर्षे झाल्यानिमित्ताने रामकृष्ण मिशनने आयोजिलेल्या कार्यक्रमास हजर न राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आणि मिशनच्या वयोवृध्द संन्यासी अध्यक्षांना भेटही नाकारल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध केला आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याक वाद जपला असून त्याबद्दल निषेध करावा की विवेकानंदांबाबत वैर प्रकट केल्याबद्दल कीव करावी, हेच कळत नसल्याची टीका भाजपने केली आहे.
मिशनच्या ३१ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. तरीही मुख्यमंत्री त्यास हजर राहणार नसल्यासंदर्भात ‘लोकसत्ता’ ने २४ मे च्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. याबाबत बोलताना प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी रेसकोर्सवर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. मौलाना आझाद विचार मंचच्या कार्यक्रमासाठी हुसेन दलवाईंच्या आमंत्रणावरुन ते २९ मे रोजी जाणार आहेत.  राष्ट्रपतींचे स्वागत करून मुंबईत हजर असूनही मुख्यमंत्री मिशनच्या कार्यक्रमास येणार नाहीत. मिशनचे कार्य जगभरात चालत असून त्याचे अध्यक्ष स्वामी सर्वलोकानंद हे वयोवृध्द संन्यासी आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत. मात्र दुसरे दिवशी लातूरला राष्ट्रपतींच्या कार्यक्रमास जाणार आहेत. यातून मुख्यमंत्र्यांचा स्वामीजींबद्दलचा आकस दिसून येतो. विवेकानंदांच्या जयंतीस १५० वर्षे झाल्यानिमित्ताने अनेक राज्य सरकारकडून देशभरात कार्यक्रम होत असताना मुख्यमंत्री आणि राज्य शासनाला एकही कार्यक्रम, उपक्रम आयोजित करणे सोडाच, पण प्रशासकीय इमारतीसमोर स्वामीजींना अभिवादनपर फलक लावण्याचीही इच्छा नाही.  शिर्डीचे साईबाबा, सत्यसाईबाबा, अन्य धर्मीय नेते आदींच्या दर्शनासाठी व भेटीसाठी हे मुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री जातात. मात्र स्वामी विवेकानंद आणि स्वा.सावरकर यांच्यासारख्यांची त्यांना अ‍ॅलर्जी असावी, अशी टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा