भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभेची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांना देण्याचे सोमवारी जाहीर केले. राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या सात फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी रामदास आठवले यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव प्रदेश शाखेने गेल्या आठवड्यातच नवी दिल्ली पाठविला होता. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पक्षश्रेष्ठींनी त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब केले. भाजप कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता सुरुवातील वर्तविण्यात येत होती. रामदास आठवले यांना महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशमधून उमेदवारी देण्याबद्दलही चर्चा होती. अखेर गेल्या आठवड्यात आठवले यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.

Story img Loader