मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून प्रशासनाच्या बेपर्वाई व दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आहे. त्यासाठी तातडीने पावले टाकून सर्व रेल्वेस्थानकांवरील सोयीसुविधांचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि अपघातग्रस्तांना रेल्वेने तात्काळ मदत करावी, अशा मागण्या मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे बोर्डाकडे केल्या.
शेलार व सोमय्या यांनी शनिवारी नवी दिल्लीत रेल्वेबोर्डाचे अध्यक्ष देवीप्रसाद पांडे व रेल्वेमंत्र्यांचे सल्लागार विवेक संजय यांची भेट घेतली. मुंबईतील प्रवाशांना किती हाल सहन करावे लागत आहेत आणि कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या जात नाहीत, हे त्यांनी रेल्वेबोर्डाच्या निदर्शनास आणून दिले. घाटकोपर स्थानकातील अपघातात मोनिका मोरे हिला हात तर तन्वीर शेखला कुर्ला येथील अपघातात पाय गमवावे लागले. रेल्वे प्रशानाच्या दुर्लक्षामुळे हे अपघात झाले असून वैद्यकीय उपचारांचा खर्च रेल्वेने उचलावा, त्यांना नोकरीत सामावून घ्यावे, सर्व स्थानकांवरील गैरसोयी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने केल्या. रेल्वेस्थानकांमध्ये वैद्यकीय उपचार किंवा प्राथमिक उपचारांची सोय नाही, रुग्णवाहिका उपलब्ध नसतात आदी बाबींकडे रेल्वेबोर्डाचे लक्ष वेधण्यात आले.

Story img Loader