पावसाळ्यातील खड्डे, अनधिकृत बांधकामे तसेच अर्धवट नालेसफाईसह भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांची पालिकेने ‘एसआयटी’च्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. पंधरवडय़ात चौकशी न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एकीकडे शिवसेना सारे काही आलबेल असल्याचे दाखवित असताना भाजपने थेट एसआयटी चौकशीची मागणी करून सेनेवर कुरघोडी केली आहे.
पहिल्या पावसातच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची दाणादाण उडाली असून ऑनलाइन तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. रस्त्यांची चाळण झाली असून तुमचे अत्याधुनिक तंत्रज्ञान गेले कोठे असा सवाल करत ‘खड्डे भरा, अन्यथा अधिकाऱ्यांना गाडण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा दम त्यांनी दिला आहे.
अनेक उपाय योजूनही ३५ ठिकाणी पाणी तुंबले तर सखल भागात पाणी काढण्यासाठी बसवलेले ७० टक्के पंप पहिल्या पावसातच नादुरुस्त झाले. तीस वर्षांवरील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक असूनही त्याबाबतही सावळा गोंधळ असल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम आहे. मुंबईतील ९८४ इमारती धोकादायक असून त्यापैकी १७५ इमारती पालिकेच्या मालकीच्या आहेत. मात्र माहीममध्ये इमारत कोसळल्यानंतरच पालिकेला जाग येते आणि पावसाळ्यात लोकांना घराबाहेर काढण्याचे उद्योग होतात. पालिका प्रशासन ठोस कारवाईसाठी इमारत कोसळण्याची वाट का पाहाते असा सवाल करून सखल भागातील जुन्या चाळी व घरांना उंची वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली.
शेलार यांनी आयुक्तांना लिहिलेले तीन पानी पत्र पाहिल्यास गेली वीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचा प्रशासनावर कोणताच वचक नसल्याचे दिसून येते. दरवर्षी हेच प्रश्न असताना आत्ताच भाजपला कशी जाग आली, असा सवाल करत शिवसेनेचे घोडे मात्र रेसकोर्सवरच अडकले असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी केला.