मुजोर मंत्री आणि मजबूर मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्ट सरकारला उलथून टाकण्यासाठी आता आरपारची लढाई लढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करतानाच, केवळ फ्लेक्स, होर्डिग्जवरचे म्हणजे ‘डिजिटल’ नेते नकोत, तर लढाऊ आणि ‘फिजिकल’ नेते हवे आहेत, असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
लढण्याची मानसिकता नसणाऱ्यांनी नेतृत्व सोडावे आणि संघर्ष करणाऱ्यांना पुढे जाऊ द्यावे. पोलिसांशी संगनमत करून दिखाऊ आंदोलन करण्यापेक्षा पोलिसांच्या लाठय़ा खाऊन तुरुंगात जाणारे जुने नेते व कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत, अशा कानपिचक्या देत सत्तेशी संघर्षांतूनच परिवर्तन घडते, असा संदेशही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपच्या षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या राज्य परिषदेत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर फडणवीस यांनी जोशपूर्ण शब्दांत मार्गदर्शन केले आणि आत्मचिंतनाचा सल्लाही दिला. निवडणुकीसाठी आता अगदी कमी अवधी असून सरकारविरोधात जनतेचा असंतोष जागृत करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांनी आपली ताकद वाढविण्यावरही भर दिला पाहिजे आणि सर्वशक्तीनिशी आंदोलने केली पाहिजेत, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.
आगामी निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकाची मते मिळवेल, अशी तयारी करण्यात येत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) धर्तीवर  ‘महाराष्ट्र लोकशाही आघाडी’ (एमडीए) निर्माण केली, तर सत्तापरिवर्तन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सत्ताधाऱ्यांशी चुंबाचुंबी करून काही मिळणार नाही. सर्वसामान्यांना मदत करा, अशा कानपिचक्या देत लुटुपटूच्या नाही, खऱ्या लढाईसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. मी विरोधी पक्षनेता असताना शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा मी एकदाही त्यांच्या दालनात गेलो नव्हतो, याची आठवण मुंडे यांनी करून दिली. ऑक्टोबरमध्ये लोकसभा निवडणुकांचे भाकितही त्यांनी केले.
मर्दानाच स्वप्ने पडतात, असे सांगत सत्तापरिवर्तनाचे १९९५ प्रमाणे पडलेले स्वप्न पुन्हा खरे करून दाखविल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही, असे मुंडे यांनी सांगितले. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भाजप नेत्यांनी हेलिकॉप्टरनेही दौरे करू नयेत, जनसामान्यांमध्ये मिसळावे, असा सल्ला मुंडे यांनी दिला.
जातीयवादाचे राजकारण मर्यादित असते. फारकाळ ते चालत नाही. हा राजकारणाचा शॉर्टकट आहे. त्याऐवजी सामाजिक, आर्थिक आणि विकासाचे राजकारण दीर्घकाळ टिकणारे असते, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. प्रसिध्दीमाध्यमांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्यामुळे कोणी जिंकूही शकत नाही आणि पडतही नाही, असेही ते म्हणाले.
माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मुंडे यांचे नाव न घेता, एका मोठय़ा नेत्याने पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, असा उल्लेख केला आणि पक्ष आपला आत्मा असल्याचे सांगितले.

मयसभा!
जे दिसते ते नसतेच आणि दिसत नाही तेच असते, हे मयसभेचे वैशिष्टय़. भाजपच्या या राज्य परिषदेत मयसभेचाही भास होता. कारण आपण कधी गटबाजी पाहिलीच नाही, आपल्या पक्षात गटबाजी नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. प्रत्यक्षात परिषदेच्या उद्घाटनास येणार असलेले मुंडे लोकसभेतील कामकाजासाठी उपस्थित राहण्याकरिता दिल्लीला गेले आणि समारोपाला हजर राहिले. गडकरी समारोपाला थांबले नाहीत. मुंडे येण्याआधीच ते व्यासपीठावरून निघून गेले होते. त्यामुळे याचे नेमके कारण काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला.

Story img Loader