शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केल्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित ११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर मंगळवारी टाच आणली. दरम्यान यावरुन संजय राऊत विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
पत्राचाळ येथील १०३९ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊतांवर कारवाई केली. प्रवीण राऊत यांच्या पालघर, सफाळे येथील जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां यांची दादर येथील सदनिका आणि वर्षां राऊत व स्वप्ना पाटकर यांच्या नावावरील अलिबागमधील भूखंडांचा टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये समावेश आहे.
राऊत यांच्या मालमत्तांवर टाच! ; संजय राऊत यांच्या पत्नीसह निकटवर्तीयांवर ‘ईडी’ची कारवाई
संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की, “कष्टाने कमावलेली ती संपत्ती ईडीने जप्त केली. हा राजकीय दबाव आहे. माझी संपत्ती काही नाही, जमिनीचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर २ रूम किचन एका मराठी माणसाचे घर, एका मध्यमवर्गीय माणसाचे घर आहे”.
“अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे ५० गुंठय़ाची जमीन २००९ मध्ये घेतली आहे. याला कुणी संपत्ती म्हणत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. भ्रष्टाचाराचा एक जरी रुपया, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे,” असंही संजय राऊत म्हणाले होते.
अमृता फडणवीसांचा टोला
संजय राऊत यांनी स्वत:चा उल्लेख मध्यवर्गीय केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाण साधला आहे. “मी खूप गोंधळली आहे. कृपया मला मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय आहे समजण्यात मदत करा. हीच व्याख्या मध्यमवर्गीय राजकारण्याला लागू होते का?,” अशी विचारणा अमृता फडणवीसांनी केली आहे.
‘ईडी’ची तक्रार पंतप्रधानांकडे!; संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत शरद पवारांची नाराजी
महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचे पवार यांनी मोदींना सांगितले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते भाजपवर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले.