शिवसेना सोडून गेलेल्यांनी लवकर परत यावे, असे सूचक विधान करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि समता परिषदेचे विदर्भातील नेते किशोर कान्हेरे यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांचे वक्तव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे उजवे हात असलेल्या कान्हेरे यांचा शिवसेनेतील प्रवेश यातून भुजबळ यांचे शिवसेनेबरोबर सूत जुळण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेच्या बेरजेच्या राजकारणामुळे भाजपमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेना महायुतीला यश मिळण्याची दाट शक्यता असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजप-शिवसेनेच्या संपर्कात आहेत. नारायण राणे यांनी भाजप-शिवसेनेची दारे ठोठावली, पण त्यांना नकार देण्यात आला. त्याचप्रमाणे भुजबळ यांच्याकडूनही शिवसेनेत परतण्याचा विचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या भुजबळ यांनी त्याचा इन्कार केला असला तरी त्यांचे उजवे हात असलेले कन्हेरे यांना शिवसेनेत पुढे पाठविले आहे. त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत सोमवारी प्रवेश होणार आहे.  
राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड सुरू असून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेचा रस्ता धरला आहे. नारायण राणे यांच्या विरोधात ते उभे ठाकल्याने राणेपुत्राचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांची भाजपशीही बोलणी सुरू होती. मात्र भाजपकडून निर्णय न घेता प्रतीक्षा करण्याची सूचना देण्यात आल्याने केसरकरांनी शिवसेनेत जाण्याचे जाहीर केले आहे. राणे शिवसेनेत येण्यासाठी धडपडत होते, पण त्यांना नकार देत त्यांच्या कट्टर विरोधकाला ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. तर केसरकरांवर गळ टाकून भाजपवर कुरघोडी केली आहे. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत.
भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ‘एकला चलो रे’चा मतप्रवाह आहे. त्यामुळे शिवसेनाही स्वबळावर लढण्याची तयारी करीत असून त्या दृष्टीनेच हे पक्षप्रवेश होत आहेत. भाजपचे प्राबल्य असलेल्या विभागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उद्धव ठाकरे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत हे वारंवार करीत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना गेली अनेक वष्रे विरोध केला असताना त्यांना जर शिवसेनेत प्रवेश देण्यात आला, तर भाजपचीही पंचाईत होणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय अजून भाजपने घेतला नसताना काही नेत्यांना शिवसेना आधीच गळाला लावत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Story img Loader