मुंबई : देशात भाजपला प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर व्यक्त केले. तसेच पंजाबमधील निकाल काँग्रेसला धक्का देणारा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. दिल्लीत या पक्षाने ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. दिल्लीच्या कामाचा फायदा पंजाबमध्ये ‘आप’ला झाला आहे. त्यामुळे पंजाब सोडले तर लोकांनी सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते आहे.
आज देशात प्रभावी राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्चपासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. त्यानंतर पुढची नीती ठरवण्यासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
पराभवाचे आत्मचिंतन करू : नाना पटोले</strong>
पाच राज्यांतील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करू आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.