मुंबई : भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची नवी दिल्लीत सोमवारची नियोजित बैठक रद्द झाली. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. भाजप किमान ३०-३२ जागा लढविण्यावर ठाम असून शिवसेनेला १२-१३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४-५ जागा देण्याचा प्रस्ताव आहे.
हेही वाचा >>> सीएए लागू झाल्यानंतर वादाची चिन्हे; बिगर भाजपशासित राज्यांमध्ये विरोध, भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा असल्याने जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीला जाणार होते. पण शिंदे व पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून भाजपची लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी बैठक झाली. त्यासाठी फडणवीस दिल्लीला गेले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे व्यग्र असल्याने तसेच सायंकाळी पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक असल्याने सोमवारची बैठक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी दोन-तीन दिवसांमध्ये अपेक्षित असून ज्या जागांबाबत वाद आहे, तेथील उमेदवार नंतर ठरविले जाणार आहोत. महायुतीतील जागावाटप अंतिम करण्यासाठीची बैठक दोन-चार दिवसांत अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.